गाझाला अन्नपुरवठा करण्यास इस्रायलची परवानगी   

जेरूसलेम : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझामध्ये मर्यादित प्रमाणात अन्नपदार्थ पाठवण्याची परवानगी दिली आहे. इस्रायलने २ मार्चपासून गाझामध्ये अन्नपदार्थांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. 
 
लष्करी अधिकार्‍यांच्या सल्ल्यानुसार इस्रायलच्या मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. तथापि, अनेक मंत्री या निर्णयाच्या विरोधात असल्याने मंत्रिमंडळात यावर मतदान झाले नाही. अंतर्गत सुरक्षा मंत्री इटामार बेन ग्विर आणि इतर उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी या निर्णयावर टीका केली. हा निर्णय हमासला ऑक्सिजन देण्यासारखा आहे. प्रथम, हमासला संपवले पाहिजे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. 
 
दोन मार्च रोजी इस्रायलने गाझावर नाकेबंदी लादली. गेल्या अडीच महिन्यांत, गाझामधील संयुक्त राष्ट्र आणि इतर संस्थांकडे असलेले अन्नसाठे पूर्णपणे संपले आहेत. अन्नधान्याच्या कमतरतेमुळे गाझामध्ये उपासमारीचा धोका वाढला आहे. यामुळे अमेरिकेसह अनेक देशांकडून इस्रायलवर दबाव वाढत होता, त्यानंतर  नेतान्याहू यांनी गाझा पट्टीत आवश्यक मदत पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले.नेत्यान्याहू म्हणाले, गाझामध्ये दुष्काळ पडू नये म्हणून गाझाला मदत पाठवणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे हमासविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवाईला नुकसान होऊ शकते. 

अमेरिकन कंपन्या करणार अन्न वाटप 

गाझाला एका आठवड्यासाठी मदत पुरवली जाणार आहे. या काळात इस्रायल गाझामध्ये अन्न वाटप करण्यासाठी नवीन वितरण केंद्रे बांधेल. ही केंद्रे इस्रायली सैन्याच्या देखरेखीखाली असतील. ती अमेरिकन कंपन्यांद्वारे चालवली जातील. इस्रायल गाझामध्ये ४ वितरण केंद्रे उघडणार आहे तर संयुक्त राष्ट्रांची गाझामध्ये ४०० वितरण केंद्रे आहेत. ही मदत केवळ काही गरजू नागरिकांपर्यंतच पोहचवली जाणार आहे.
 

Related Articles